सफाई कामगारांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण

Foto
सदनिकांची सोडत; हसूलमध्ये दोन इमारतीत ३२ घरे
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महापालिकेच्या घनकचरा विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत सफाई कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या ३२ सदनिकांच्या वाटपासाठी सोडत प्रक्रिया मंगळवारी महापौर समीर राजूरकर व महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. पात्र लाभार्थ्यांना या सदनिका मालकी हक्कावर मोफत देण्यात येणार आहेत.
सोडत प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात आली. यावेळी महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, सभागृह नेते गोविंद केंद्रे, विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद, गलिच्छ वस्ती सुधार समिती सभापती जालिंदर शेंडगे, गटनेते हाजी शेरखान, नगरसेवक बालाजी मुंडे, फिरोज खान, मनपा आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपायुक्त अपर्णा थेटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शासनाच्या निर्णयानुसार, महापालिकेत २५
वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा बजावलेल्या सफाई कामगारांना, तसेच सेवेत असताना अथवा सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झालेल्या सफाई कामगारांच्या पात्र वारसांना मालकी तत्त्वावर मोफत सदनिका देण्याची तरतूद आहे. त्यानुसार महापालिकेने ही योजना राबविली आहे. या योजनेंतर्गत हसूल येथील गट क्रमांक २६६ मधील जागेवर दोन इमारती उभारण्यात आल्या आहेत. या दोन्ही इमारतींमध्ये मिळून एकूण ३२ सदनिका आहेत. प्रत्येक इमारतीमध्ये चार सदनिकांचे चार मजले असून, सर्व सदनिका १ बीएचके स्वरूपाच्या आहेत. प्रत्येक सदनिकेचे बांधकाम क्षेत्रफळ सुमारे ३० चौरस मीटर आहे. निविदेतील तरतुदीनुसार सदनिकांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions